Followers

Sunday, January 1, 2017

कल्हई वाला

नविन वर्षात नविन संकल्प करावा म्हणतात. मी तसे काही संकल्प वगैरे करण्यावर विश्वास ठेवत नाही. पण गेली काही वर्षे माझं लिखाण पुर्ण बंद झाले आहे. २०११ नंतर ब्लॉग पण लिहिला नाहिये. हे कुठे  तरी टोचतय. इथे सर्व कामे आटपून थोडा वेळ मिळतोय त्याचा सदूपयोग  या वर्षात करावा असा विचार करतोय. तेव्हा शुभस्य शिघ्रम म्हणत आज एक सुरवात तर करून पाहू.........

कल्हई वाला

"कल्हईईई...SSS" अशी कोल्हेकूई सारखी आरोळी वाडीत घुमली की आम्ही मुले हातात असेल तो खेळ सोडून आरोळी च्या दिशेने धूम ठोकत असू. कार्टून म्हणजे काय , टिव्ही चा  शनिवार , रवीवार  चे चित्रपट, छायागीत, चित्रहार आणि आमचं लहान मुलान्च हक्काच "किलबिल" सोडलं तर काहीच उपयोग नसलेल्या आणि खेळाच्या भाउ गर्दी च्या त्या काळात  ठिगळ लावलेलं पण पान्ढरा शुभ्र सदरा, तसेच धोतर, पान्ढर्‍या शुभ्र मिश्या, आणि उन्हातान्हात फ़िरून रापलेला काळा ठिक्कर सुरकुत्या असलेला चेहरा असा   कल्हई वाला हा आमच्या साठी एक "सुपरहीरो" असायचा. माझ्या साठी तो एका महान शास्त्रज्ञा पेक्षा कमी नसायचा.  कमरेची खाली सरकणारी चड्डी दोन बोटाच्या चिमटीत पकडून ओढत सुस्साट धावत जेव्हा मुलं त्या कल्हई वाल्याच्या भोवती गोळा होत तशी त्या कल्हईवाल्यात जोम येई..   इथपर्यन्त कोणीतरी त्याला आपलं एकाध पितळी भान्ड त्या कल्हईवाल्याजवळ कल्हई करण्यासाठी दिलेलं असायच. आपल्या कल्हई केल्या सारख्या शूभ्र झूपकेदार मिशान्वर हात फ़िरवत आणि एकवार सभोवार जमलेल्या दर्शकगणाकडे म्हणजे आमच्या घोळक्या कडे नजर फ़िरवून कल्हईवाला आपलं काम अश्या अविर्भावात सूरू करे की जणू आम्ही त्याच्या खिजगीणतीतच नाही.

आपली खान्द्याला लटकवलेली झोळी खाली ठेवून त्यातून तो एक एक अवजार अगदी काळजीपूर्वक काढून ठेवत असे.  आपण बसलेल्या ठिकाणा समोरच एक छोटा खड्डा तो खणत असे आणि त्यात तो त्याच ते आग ओकणारं अवजार पूरत असे आणि ते फ़रफ़रत पेटू लागे. त्याच्या ठिणग्या उडत. कल्हईवाला मग एक एक भान्ड हातात घेत असे , निरखून त्याला त्या आगीत धरे. त्या चमत्कारी अवजाराचं आम्हाला खूप अप्रूप वाटे. आई कितिही वेळ स्टोव्ह वर भान्डे ठेवत असे पण ते भान्ड कधीच लालबुन्द होत नसे. पण कल्हईवाल्याच्या त्या अवजारा समोर भान्ड धरले की काही क्षणात ते भान्डं लालबून्द होत असे. आमच्या बाल मनाला तो एक चमत्कार वाटे. आम्ही एक मेकाच्य चेहर्‍या कडे पहात असू.  लालबून्द झालेल्या त्या भान्ड्यात कल्हईवाला काहीसं टेकवे ते लगेच वितळून त्याचे आळूच्या पानावर जसे पाण्याचे थेम्ब असतात तसे थेम्ब तयार होत. ते तसे झाले की त्यचे डोळे त्य थेम्बा सारखेच चमकत मग त्याची हालचालीला गती येई. तो आपल्या पोतडीतून कापसा सारखा पुन्जका काढे आणि त्याने ते चमकदार थेम्ब त्या भान्ड्याच्या आत पसरवत असे आणि खुप वेळ ते फ़िरवे. क्षणात ते भान्ड चमकू लागे अगदी नव्या सारखं. आम्हा लहान मुलाना याची देही याची डोळा एक चमत्कार पाहिल्या सारखे वाटे.

एका पाठोपाठ एक अशी पितळी भान्डी कल्हई वाला  चमकवत जाई. आम्ही मुलं भारावून हे सगळं पहात असू. मग भान्ड्यान्चा मालक त्याला त्याचा मोबदला देत असे. हातात टेकवलेल्या त्या मोबदल्या कडे हताश पणे पहात तो ते डोक्याशी नेवून मग कमरेच्या बटव्यात  ठेवत मालका ने दिलेलं पाणी घटाघटा घशात रिकामं करे. त्याची ते हताश पहाणं काळजात कुठे तरी चिरत जाई.  एव्हाना त्याचं ते आग ओकणारं अवजार थंड झालेलं असे. त्याला तो खड्ड्यातून उपसून काढून आपल्या झोळीत व्यवस्थीत ठेवत असे. आपला पसारा आवरून खड्डा बूजवून कल्हईवाला त्याची झोळी खान्द्याला लटकावत असे आणि आपल्या वृद्ध गुढग्याबर भार देत तो उठत असे आपल्या पुढील पाडावा कडे जाण्या साठी.  डोम्बार्‍याचा खेळ संपल्यावर होते तशी दर्शकान्ची पान्गापान्ग होई..

"कल्हईई" अशी आरोळी ठोकत जाणारा तो पाठमोरा कल्हई वाला चालत चालत आजकाल कुठे तरी निघूनगेला आहे. पीतळी भान्ड्या  बरोबरच तो अडगळीत गेला आहे. पण जाताजाता आमच बालपणिच भावविश्व अनेक आठवणी आणि संमिस्र भावनानी भरून गेला आहे.  आज इथे चेन्नै मधे भर दुपारी जेवणा नंतर जरा वामकुक्षी घेण्याच्या विचारात असताना तीच आरोळी ऐकल्याचा भास झाला आणि मी बाल्कनी कडे धावलो. काळाच्या ओघात हरवलेला कल्हैइवाला पुन्हा दिसेल असं वाटलं , पण नाही, इथल्या भाषेत तसच  काहीतरी ओरडत जाणारा तो कोणी भलताच फ़ेरिवाला होता. आमचा "सुपरहीरो" खरोखरच काळाच्या ओघात कुठेतरी लुप्त झाला आहे.