Followers

Thursday, November 26, 2009

चला आपणही अतिरेकी बनूया......


सकाळी सकाळी मला मित्राने वर्तमान पत्र डोळ्यासमोर फ़डकवत २६/११ च्या श्रद्धांजली आणि त्याच्या होणार्‍या ग्लेमरयजेशन बद्द्ल माझा "व्ह्यू" विचारला आणि सकाळी सकाळी मस्तकात तिडिक गेली. पण सकाळ ची प्रसन्नता ढळू द्यायची नाही असा निग्रह करून मी शक्य तेवढे डोके शांत ठेवत त्याला निरुत्तर केलं.

काय कप्पाळ "व्ह्यू" देणार ? ज्या देशात जनतेच्या मताला किम्मतच नाही, ज्या देशातील जनतेला आपल्या हक्कांची पायमल्ली केली जातेय, आपल्या जगण्याच्या आधिकारावर सरळ सरळ घाला घातला जातोय याची जाणिव नाही, ज्या देशातील जनता स्वत: च्या अस्तित्वावर झालेल्या हल्ल्या चा निषेध स्वत: पेटून उठून रस्त्यावर उतरुन, राजकारण्याना चाबकाने फ़ोडण्या ऐवजी, मेणबत्त्या पेटवून "दिखाऊ चमकोगीरि आणि फ़ालतूगीरी" करणार्‍या तेवढ्याच "फ़ालतू" भारतीय जनतेला कशावर "व्ह्यू" देण्याचा आधिकारच नाहिये. त्यानी सकाळी उठाव, आज बॉम्ब हल्ल्यात किती मेले ? आपण परत सुरक्षित घरी येऊ ना? अशी काळजी करत घर सोडावं, निमुट कार्यालयात काम करावं, संध्याकाळी जर (ट्रेन मधे बॉम्ब ब्लास्ट झाला नाही तर धक्के खात) घरी परतावं, आणि कुटुंब कबिल्या बरोबर "आज चा दिवस सरला, आज जगलो, आज वाचलो" अशी धन्यता मानत झोपी जावं. वर तोन्डी लावायला महात्म्याच (?) तत्वज्ञान "अन्याय करणार्‍या पेक्षा अन्याय सहन करणारा अधिक दोषी असतो." असं बोम्बलत फ़िराव. विनाकारण "व्ह्यू" कशाला द्यावेत?

२६/११ नंतर गेट-वे जवळ जी मेणबत्त्यान्ची ड्रमेबाजी झाली त्यातील एकाही "चमकोला" पुढिल ३६५ दिवसात असा प्रश्न पडला नाही कि "पुढे काय?". अतिरेक्याना शब्दश: "पोसणार्‍या" सरकारला त्या दिवशी जमलेल्या विशाल जनसमूहाने एकदाही धारेवर धरलं नाही कि जाब विचारला नाही.

मेणबत्त्या लावून जर दहशतवाद संपला असता आणि मृतात्माना शांती लाभली असती तर हे जग अजूनपर्यन्त नंदनवन झाले असते. २६/११ च्या कसयाला गेट-वे जवळ ज्या दिवशी जाहीर फ़ाशी दिली जाईल तेव्हाच २६/११ च्या मृतान्च्या आत्म्यास शान्ती मिळेल. पण प.पु. बापुन्च्या देशात या जन्मात तरी असे होईल असे वाटत नाही.
उलट त्या अतिरेक्याचे "आज चीकन बिर्याणी" "उद्या तंगडी कबाब" असे 'बालहट्ट' आमचं सरकार ज्या तत्परतेने पुरविते आहे ते पाहून आमच्या जीभेची चव जातेय.

बेछूट गोळीबार करून निरपराध लोकान्चा जीव घेणार्‍या अतिरेक्यावर आमचं श्रीमंत सरकार दिवसाला ८५ हजार रुपये खर्च करते ते पाहून कधी कधी असे वाटते की सरकार तरुणाना "अतिरेकी बना" असा एक छुपा संदेश देत आहे. या देशात सामान्य माणसाला जगण दुरापास्त आहे पण अतिरेक्याना मान पान आहे. तेव्हा तरुणानो सरकारच्या भावना समजून घेऊया... सरकारच्या इच्छेचा आदर राखुया ..... चला आपणही अतिरेकी बनूया......

मुम्बई स्पिरिट


३१ करोड रुपये..., ३६५ दिवसात , दळभद्री, नपुंसक, निष्क्रिय, भारत सरकारने तुमच्या आमच्या कष्टाच्या कमाईवर "कर" या गोन्डस नावाने डल्ला मारुन जमा करुन, एका क्रुर, निर्दयी कसायावर खर्च केलेल्या पैशाचा हा आकडा आहे..... २६ नोव्हेम्बर २००८ च्या काळरात्रीला आज बरोबर एक वर्ष पुर्ण होत आहे. ते आले, त्यानी मृत्युचा नंगा नाच केला. आणि स्वत:सुद्धा मरून गेले. २६ नोव्हेम्बर ने अनेकाची आयुष्ये कायमची बदलून टाकली आहेत.

दहशतवाद 'मुम्बई स्पिरिट' ला धक्का लावू शकत नाही, असा कान्गावा जर कोण करत असेल तर तो पोकळ आहे. जखम जर भळ्भळती असेल तर ती लपवता येत नाही. दहशतवाद्यानी मुम्बई ला जबर जखमी केलय खर पण हे युद्ध मुम्बईकरानी केव्हाच मान्य केलय किम्बहूना ते त्याला तोन्ड द्यायला कंबर कसून तय्यार असतात. मग ते मार्च १९९३ असो, की ७/११.... ते हल्ला करतात आणि मुम्बईकर त्याना आपल्या कृती ने नेस्तनाबूत करतात.

...पण या वेळी मात्र हेच आमच "स्पिरिट" थोड ढासळतय. ...... नाही...दहशतवाद्याना आम्ही घाबरलो नाहिये ते अम्हाला घाबरवू शकत नाहीच मूळी. आम्ही घाबरलोय ते २६/११ नंतर जो सरकारी दहशतवाद सुरू आहे त्याला. गोळ्यान्चा वर्षाव अन्गावर झेलून ज्या अतिरेक्याला आमच्या बहादूर पोलिसानी पकडले ते काय त्याच्यावर ३५ करोड रुपये खर्च करण्या साठी? या ३५ करोड रुपया मधे किती पोलिसान्च्या वसाहती बान्धता आल्या असत्या? किन्वा किती पोलिसाना शस्त्र किन्वा संरक्षण कवच पुरवता आली असती ? ज्या अतिरेक्याने मृत्युचा नंगा नाच केला त्याच्यावर पैसा खर्च करणार्‍या सरकारच डोक ठिकाणावर नक्किच नाही.

आमचे "मुम्बई स्पिरिट" ढासळतय ते दहशदवाद्यान्च्या अतिरेकाने नाही तर ते या नपुंसक, निष्क्रिय सरकारच्या निष्क्रियतेच्या अतिरेकाने. मनात विचार येतो दहशतवादी कोण ? जे अचानक येऊन अंधाधुन्द गोळ्या चालवून क्षणात शेकडो लोकाना मारतात ते ? की आपल्या निष्क्रियतेच्या कळसाने लोकांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण करून लोकाना क्षणोक्षणी मारतं ते सरकार? की मग.. चवताळून उठून सरकारला जाब विचारण्या ऐवजी मेणबत्त्या लावून "चमकोगिरि" करत निषेध व्यक्त करणारं ढोन्गी,वान्झोटं आणि मुर्दाड "मुम्बई स्पिरीट"